जि.प.प्रा.शाळा बिबथर ता.कळमनुरी जि.हिंगोली


शाळेबद्दल



                बिबथर ता. कळमनुरी जि. हिंगोली हे २५० लोकसंख्येच छोटसं खेडे गाव. १९७३ साली गावात जिल्हा  परिषदेची शाळा आली आणी सुरू झाला शिक्षणाचा प्रवाह. त्या आधी गावातल्या चिंचेच्या झाडाखाली शाळा भरायची . गावातील जाणकार लोकांना वाटायचे आपल्या लेकरांना शिक्षणाची सोय झाली पाहिजे . गावात जिल्हा परिषदेची शाळा आली पाहिजे म्हणून त्यांनी अथक परिश्रम करून गावात हि शिक्षणाची गंगा आणली . या मंडळीमध्ये प्रामुख्याने श्री .रामरावजी नागोराव शिंदे ,श्री.देवरावजी नागोरावजी शिंदे ,श्री.रामरावजी पतंगे यांची नावे अभिमानाने घ्यावी लागेल . 

                             आज या शाळेचे विद्यार्थी काही शिक्षक झालेत ,काही प्राध्यापक ,काही डॉक्टर काही उच्च विद्याविभूषित तर काही स्वतःच्या पायावर मोठे झाले. या सर्वांची प्रगती पाहिली की जुन्या वूद्धांच्या डोळ्यात एक झळाळी येते व त्यांनी केलेल्या परिश्रमाचे सार्थक झाले असा भाव त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडतो तेव्हा धन्य धन्य झाल्यासारखे वाटते .

                           १९७३ पासून या शाळेत खूप शिक्षक येवून गेलेत .पण मोजक्या शिक्षकांनी लोकांच्या मनात घर निर्माण केले . याचा अर्थ असा नाही की त्यांनी काहीच केले नाहीत . त्यांनी त्यांच्या परीने भरपूर प्रयत्न केलेत . शाळेत ०७/०१/२००९ रोजी श्री . अमोल देविदास खंगार यांची नियुक्ती झाली पुढे जून २०११ मध्ये सहायक शिक्षक श्री . एस . पी . शिंदे यांची बदली झाल्यामुळे ते शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक झालेत .

                 अतिशय गरीब परिस्थितीत शिक्षण झाल्यामुळे आपणही गरीब व ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी करावे असे त्यांना नेहमी वाटायचे आणि प्रभारी मु . अ . झाल्यानंतर त्यांनी ती जबाबदारी स्विकारली . गावातील तरुण मुले ,सरपंच ,मातब्बर मंडळी या सर्वांच्या सहकार्याने १५/०८/२०११ ला शाळेत वृक्षारोपण केले व आज दिसणाऱ्या हिरव्या सुंदर शाळेचा पाया रचला . या कामात गावकऱ्यांनी शाळेला जे सहकार्य केले त्याबद्दल हे शाळा प्रशासन सदैव त्यांचे ऋणी राहील .

                  हे कार्य करतांना त्यांना मोलाची साथ मिळाली सहायक शिक्षक श्री .शिवाजी विश्वनाथराव देशमुख यांची.  रिक्त जागेवर ०२/०९/२०११ रोजी त्यांची नियुक्ती या शाळेवर झाली . त्यांनीही अतिशय गरीब परिस्थितीत स्वतःचे शिक्षण पूर्ण केलेले होते . शिक्षणाबद्दल त्यांच्या मनातही तितकीच आस्था होती . शाळा समृद्धीकरण प्रक्रियेला आता गती मिळाली . शाळेला नवीन शाळा खोली पंचायत समिती मार्फत मिळाली त्यामुळे एका खोलीत चार वर्ग भरण्याची परंपरा बंद झाली . मुलांचे शिक्षणात मन रमायला सुरुवात झाली .

              विद्यार्थ्यांचे अध्ययन अध्यापनात प्रक्रियेत लक्ष लागावे यासाठी भौतिक व नैसर्गिक वातावरण निर्मिती करणे गरजेचे आहे  सर्वांना माहित आहे म्हणून आधी तशी शालेय वातावरण निर्मिती करणे अतिशय गरजेचे आहे हे त्यांनी जाणले व सर्वांनी अथक मेहनत घेऊन शालेय वातावरण निर्मिती मध्ये हातभार लावला व खाजगी शाळांना लाजवेल असा भौतिक परिसर निर्माण केला व सर्वांचे स्वप्न सत्यात उतरले .
२०११ ला शाळेची बाग अशी होती . पुढे फुलझाडांच्या जागेत भाजीपाल्यांची लागवड करण्यात आली.आता हा परिसर हिरवागार झालेला आपल्याला दिसून येईल .

                    परिस्थितीत बदल घडवून आणणे जितके कठीण असते तितकेच आवश्यकही. आज बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल आपल्याला दिसून येतो. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र सन २०१५ - २०१६ च्या अनुषंगाने ही संधी आपल्याला चालून आलेली आहे . तुम्ही केलेल्या कार्याचा नक्कीच गौरव होतो. जेव्हा एखादा तुमचा विद्यार्थी जीवनाच्या वाटेवर तुम्हाला भेटेल तेव्हा त्याने तुमच्याविषयी सार्थ अभीमान दाखविला पाहिजे असे जर तुम्हाला  वाटत असेल तर कार्य करून दाखविण्याची खरी वेळ आलेली आहे .
                  



           आयुष्य वेळेच्या घड्याळाच्या निसटत्या वाळूसारखे आहे; ही वाळू संपणार . पृथ्वीवर आलेला प्रत्येक सजीव हे जग सोडून जाणार हे निश्चित आहे. मग राहणार काय ? तुमच्या आमच्या कार्याची एक आठवण जी नेहमीसाठी तुमचं अस्तित्व जपून असेल. मित्रानो टीका करणारे खूप मिळतील ,शंका घेणारे खूप मिळतील,पाय ओढणारे खूप मिळतील .पण त्यापलीकडेही सकारात्मक दृष्टीने, बघा आयुष्य खूप सुंदर आहे . या सुंदर जगात काही सुंदर माणसेही तुम्हाला मिळतील त्यांची सोबत घ्या,त्यांचा हात धरा ,टीका करणाऱ्याला टीका करू द्या ,बोलणाऱ्याला बोलू द्या तुम्ही फक्त काम करत जा. तुमच्या चांगल्या, पवित्र कार्याची पावती तुम्हाला हा निसर्ग देणार आहे. मित्रानो निसर्गाचा नियम आहे " जे पेराल तेच उगवेल, "
               तुमच्या विचारांची , आचारांची एक प्रभावशाली तरंग उठू द्या आणि त्याच्या प्रवाहात रंगून जाऊ द्या वातावरणाला . त्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होईल. तुमची अदृश्य प्रतिमा या पृथ्वीतलावर तुम्ही नसतानाही उमटेल .
              


                                  आम्हाला माहित नाही आम्ही चांगल करत आहोत की नाही. बोलणारे बोलत राहतील पण आमचं  काम सदैव असेच चालू राहील. आज या शाळेवर उद्या दुसऱ्या शाळेवर. आणि आम्हाला खात्री आहे जिथे जिथे आम्ही जाणार तिथला परिसर प्रेम , जाणीव ,परोपकार ,मेहनत ,विश्वास ,ममता ,जिद्द यांनी उजळून निघेल. मानव जातीसाठी काहीतरी चांगल करण्याची , ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांना घडविण्याची आम्हा शिक्षकांची ही चळवळ निरंतर चालू राहील अगदी शेवटच्या श्वासापर्यंत …. अविरतपणे !




















२ टिप्पण्या:

  1. अमोल सर तुमचे सर्वप्रथम अभिनंदन!बिबथर शाळेचा पूर्वीचा परिसर आणि आताचा परिसर बघता तुम्ही खूप मेहनत घेतली तुमच्या कार्यास सलाम!
    श्री चवरे रुद्राप्पा (मुख्याध्यापक)
    जि प प्रा शा खैरी ता सेनगाव जि हिंगोली

    उत्तर द्याहटवा