…। जिल्हास्तरीय शिक्षण परिषद हिंगोली …।
 |
| शिक्षण परिषदेला उपस्थित शिक्षक बांधव |
महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम २०१५ - २०१६ ची जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे. सातारा येथील कुमठे बीटच्या घवघवीत गुणवत्तापूर्ण यशाने अवघा महाराष्ट्र भारावून गेला आहे. ज्ञानरचनावादी विद्यार्थीकेंद्रित शिक्षण पध्दतीचा अवलंब सगळीकडे केला जात आहे. येणाऱ्या वर्षात शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल झालेला आपणास दिसून येईल. शिक्षण मंत्री
श्री विनोदजी तावडे , प्रधान सचिव
श्री नंदकुमार साहेब आणि शिक्षण आयुक्त
श्री डॉ. पुरुषोत्तमजी भापकर यांनी शिक्षण क्रांतीची जी मशाल पेटवली आहे त्या मशालीच्या दैदिप्यमान प्रकाशाने अवघा महाराष्ट्र उजळून निघणार आहे. राज्यघटनेने दिलेला शिक्षणाचा मुलभूत अधिकार खऱ्या अर्थाने दिन दलितांच्या , मागासवर्गीयांच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी उपयोगी पडेल असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. या बदलाच्या प्रवाहामध्ये आम्हा शिक्षक बांधवाना द्वेष , मत्सर ,तिटकारा ,दुजाभाव , लहान मोठे पणाची भावना विसरून एकजुटीने हा प्रगत महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आम्हा शिक्षक बांधवाना ही धुरा सांभाळण्याची व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परमेश्वर शक्ती देवो.
शिक्षण आयुक्तांनी पूर्ण महाराष्ट्रात शिक्षण परिषदा चे यशस्वी आयोजन करून या मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली आहे. दिनांक ०५/०२/२०१६ रोजी हिंगोली जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेली विशाल शिक्षण परिषद , त्याला उपस्थित आमचा विशाल शिक्षक जनसमुदाय आणि परिषदेत उत्स्फूर्त सहभागी झालेले आमचे अधिकारी याची कल्पना केली की डोळे भारावाल्याशिवाय राहत नाही. या सर्वांच्या सहकार्याने आणलेल्या या गंगेचे पाणी आम्हाला तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवायचे आहे आणि हीच आमची नैतिक जबाबदारी आहे. या सर्व मातब्बर व अनुभवी अधिकाऱ्यांच्या नजरेतून हा उद्याचा प्रगत महाराष्ट्र बघायचा आहे .
शिक्षण परिषदेचे आयोजन अगदी शिस्तबद्ध पद्धतीने केलेले होते. परिषदेला जिल्हा परिषद अध्यक्षा
सौ.लक्ष्मिबाई यशवन्ते , उपाध्यक्ष
श्री राजेश्वरराव पतंगे, शिक्षण सभापती
श्री. अशोकराव हरण, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी
श्री तुकारामजी कासार ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
श्री. मधुकरराव आर्दंड ,माध्यमिक शिक्षणाधिकारी
श्री दिपकजी चवणे, प्राथमिक शिक्षणाधिकारी
श्री. गंगाधरराव जाधव , महिला व बालविकास अधिकारी
सौ. तृप्तीताई ढेरे व इतर मान्यवरांची उपस्थिती होती. सर्व जनसमुदायाचे आवडते
डॉ. पुरुषोत्तम भापकर शिक्षण आयुक्त हे परिषदेचे प्रमुख अतिथी होते .
स्वागत समारंभानंतर प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी
श्री . गंगाधरराव जाधव यांनी केले त्यानंतर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी
श्री तुकारामजी कासार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . त्यानंतर
सर्वांनी आपआपल्या कार्याचे सादरीकरण केले .
DIET च्या प्राचार्या
सौ. जयश्री आठवले यांचे सादरीकरण ,
BEO सेनगाव श्री. पातळे साहेब यांचे सादरीकरण , आमचे आवडते शिक्षण विस्तार अधिकारी
श्री सोनुने साहेब यांचे सादरीकरण आणि जिल्ह्यातील तळमळीने कार्य करणाऱ्या आमच्या शिक्षक बांधवाचे सादरीकरण . सर्वांच्या सादरीकरणातून त्यांच्या अथक प्रयत्न व मेहनतीचे यथार्थ दर्शन होत होते. सादरीकरणातून अख्खे सभागृह सकारात्मक उर्जेने भरून ओसंडून वाहत होते. या सादरीकरणात विकासनगर कळमनुरी च्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या
'गुणवत्ता गुणवत्ता… ध्यास आमचा गुणवत्ता' या गीताने उपस्थितांची मने जिंकली . भापकर साहेबांनी प्रेरित होऊन या चिमुकल्यांना ५०००/- रुपयाचे पारितोषिक दिले .
 |
| गीत सादर करतांना विकासनगर कळमनुरी शाळेचे विद्यार्थी |
भापकर साहेबांनी प्रत्येक सादरीकरणाचे कौतुक केले आणि पुढील कार्यवाहीसाठी सूचना व शुभेच्छा दिल्या. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मधुकरराव आर्दंड यांनी सभागृहाला संबोधित केले. यावेळी त्यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणीला उजाळा दिला व ' मी कसा घडलो ' याची प्रचीती दिली. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही , शिक्षणानेच मनुष्य मोठा व विकसित होतो याची जाणीव त्यांनी त्यांच्या भाषणातून करून दिली.
 |
| मार्गदर्शन करतांना CEO श्री मधुकरराव आर्दंड |
त्यानंतर प्रमुख अतिथी डॉ . पुरुषोत्तम भापकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
 |
| डॉ पुरुषोत्तम भापकर शिक्षण आयुक्त मार्गदर्शन करतांना |
प्रगत महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी , त्यांना आलेल्या अडचणी ,त्यांचे शिक्षण क्षेत्रातील अनुभव याची सांगड त्यांनी त्यांच्या भाषणातून घातली. महाराष्ट्र प्रगत करण्यासाठी प्रत्येक घटकाचे योगदान महत्वाचे आहे. हे राष्ट्र निर्माण करण्याचे सामर्थ्य आमच्या शिक्षक बांधवात आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाच्या वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या .
अतिशय उत्साहाच्या वातावरणात हिंगोली जिल्ह्याची शिक्षण परिषद पार पडली आणि परिषदेला उपस्थित प्रत्येक शिक्षकाच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता .
शब्दांकन - श्री.अमोल देविदास खंगार
प्रा.शि.मु.अ.प्रा.शा.बिबथर
मो. 9923838222